महाराष्ट्राच्या पारमार्थिक क्षेत्रात भगवंताची नगरी बार्शी फार प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे तालुक्याचे ठिकाण असून या शहरालाच पूर्वी पंकक्षेत्र, पंकावती, पंकपूर व द्वादशक्षेत्र असे म्हटले जात असे. अशा या पंकावती नगरीत द्वादशीक्षेत्री श्री भगवंताचे मंदिर स्थिरावले आहे. भगवंत मंदिर हे अत्यंत प्राचीन देवस्थान व पवित्र तीर्थस्थळ आहे. भगवंत भक्त, वैष्णवग्रंथी श्री अंबरीष याची निश्चल भक्ती व भगवंताची भक्तवत्सलता यांचे बार्शी हे शाश्वत स्मारक आहे.
बार्शींची प्राचीन नावे, परिसरातील तीर्थे व ज्यामुळे ही भूमी पवित्र तीर्थरुप होऊन श्री भगवंताच्या शाश्वत सानिध्याने अभिमंत्रित झाली, या विषयीचा पुराणांतर्गत इतिहास आजही सापडतो. श्री भगवंत माहात्म्य या छोट्याशा पुस्तिकेत बार्शी, भगवंत व अंबरीष यांचे महात्म्य श्री नारायण गंगाधर कथले यांनी फार पूर्वी या पुस्तकात कथित केले आहे.
बार्शीचे मुळ नांव ‘द्वादशी क्षेत्र असे आहे. द्वादशीला प्राकृत भाषेत ‘बारस’ असे नाव आहे. भक्तश्रेष्ठ राजा अंबरीषाच्या साधन द्वादशीच्या व्रतावरुन द्वादशी म्हणजे बारसपुर- ‘बारशी’ -बार्शी असे नांव प्रचलित झाले असावे.
भक्तश्रेष्ठ राजा अंबरीषाच्या रक्षणासाठी साक्षात् श्री विष्णुंनी लक्ष्मीसह’“भगवंत” या नावाने येथे अवतार धारण केला. भगवंताचे विशाल मंदिर हे बारस नगरीचे वैभव आहे. अखिल भारतात केवळ बार्शी येथेच भगवंत या नावाने श्री विष्णुचे प्रसिध्द मंदीर आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करुन पांडुरंगाचे दर्शन घेऊन बार्शीला द्वादशी दिवशी श्री भगवंत दर्शन पूजनानंतर उपवास सोडावयाचा असा भक्तजन वारकरी यांचा वर्षानुर्षाचा प्रघात पडलेला आहे. हे साधन द्वादशीचे व्रत म्हणजे दशमीला एकभुक्त राहून, एकादशीला निर्जल उपवास करुन द्वादशीला सूर्योदयाच्या आत तिर्थ प्राशन करुन व्रताचे पारणे करायाचे, असे हे व्रत आहे. राजा अंबरीषाने हे कठोर असे साधन द्वादशीव्रत वर्षभर केले होते. त्याचा संदर्भ पुढील कथेत येईल.
श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना वारकरी ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठळ’ असा उद्घोष करतात. तर भगवंत नगरीत भक्त ”अंबरीष वरद श्री भगवान” असा उद्घोष करतात.
राजा अंबरीषाची कथा ही अनेक महत्वाच्या पुराणामधून व ग्रंथामधून आली आहे. परमपवित्र अशा अंबरीषाचे चरित्र व श्री भगवंताचे अवतरण यांचे अद्वैत भगवंत नगरीत पहावयास मिळते. भगवदभक्त अंबरीष राजाच्या कथेचा उल्लेख श्रीमत् भागवत पुराणाच्या नवव्या स्क॑धातील चवथ्या अध्यायात, पदमपुराणात, उत्तरखंडात, उपाख्यानांत, स्कंधपुराणात. गुरुचरित्राच्या तिसर्या अध्यायात अंबरीष कथा आली आहे. कामंदकीय नितीसार तसेच गुमानी पंडित रचित शतोपदेश प्रबंध या संस्कृत ग्रंथातही अंबरीषाचा उल्लेख आला आहे. याशिवाय श्री अंबरीष महात्म्य नामक २३ अध्याययुक्त ग्रंथात संस्कृत भाषेत अंबरीष चरित्र वर्णिले आहे. तदनुषंगानेच प्राकृत भाषेत (मराठी) १७ अध्यायात ‘अंबरीष विजय’ नामक ग्रंथात अंबरीषाची कथा आली आहे.
‘श्रीअंबरीषमहात्म्य’ या ग्रंथात राजा अंबरीषाची जी कथा आली आहे ती बार्शी क्षेत्रातील स्थलांशी निगडीत आहे. राजा अंबरीषाची वंशावळ खालीलप्रमाणे आहे. वैवस्वत मनु (सूर्यवंशातील) भरु – वृक – अंशुमन – नभग – भरु वृक – बाहू – सगर – पाचजन्य अशुमत – दिलीप भगीरथ – श्रुत नभग – नाभाग – अंबरीष अशी होय.
अंबरीषाच्या राजधानीचे नांव साकेत म्हणजेच आयोध्या हे होय. तेथे तो राज्य करीत असताना त्याचा पुतण्या श्रुतवर्मा गौडदेशीचा राजा दुराचारी निघाला. त्याचे व अन्य दृष्टांचे निर्दालन अंबरीषाने केले. मात्र स्वगोत्रनाशाचे पातक लागल्याने तो मनात खिन्न झाला व राज्यत्याग करुन तीर्थयात्रेला निघाला. नारदमुनींनी त्याला एकादशी व साधन द्वादशीच्या व्रताचा महिमा सांगून ते व्रत करुन विष्णुला संतुष्ट केल्यावर तुझे पातक नष्ट होईल असे सांगीतले. प्रवास करता – करता दंडकरण्यात (महाराष्ट्र प्रांतात) कोशिक ऋषींच्या पंकक्षेत्र नामक पवित्र आश्रम प्रदेशात अंबरीषाने वास्तव्य केले. तेथे पंक नगरी (नंतरच्या काळातील द्वादशीपूर) वसविली गेली. वेगवेगळी पवित्र तीर्थ भगवंताच्या समवेत तेथे वास्तव्याला आली. व तेथे राजा अंबरीषाने साधन द्वादशीचे व्रत सुरु केले. त्यानंतर दुर्वासांचे आमगन शाप, सुदर्शन चक्राचे भ्रमण हे कथानक घडत गेले.
श्रीमत् भागवताच्या ९ व्या स्कंधातील चोथ्या अध्यायात राजा अंबरीपाची कथा आहे. परंपरागत आख्यायिकेनुसार तो द्वादशी क्षेत्र (बार्शी) येथे पुष्पावती नदीच्या काठी तप करत होता अशी भक्तांची श्रद्धा आहे. तो ‘साधन द्वादशीचे ‘ व्रत करीत होता. त्यांची सत्वपरिक्षा पाहण्यासाठी महाकोपी दुर्वास मोठ्या शिष्यपरिवारासह बार्शींस आले. कार्तिक शुध्द एकादशी झाल्यानंतर अंबरीषाचे द्वादशी सोडण्याचे व्रत होते. त्यावेळी दुर्वासऋषी नदीवरुन स्नान करुन भोजनासाठी येणार असताना मुद्दामच राजाचा व्रतभंग व्हावा म्हणून उशीराने तेथे गेले. राजाने खूप वाट पाहन नाईलाजाने फक्त तीर्थ प्राशन करुन द्रादशी सोडली. व्रतभंग होऊ दिली नाही. दुर्वासांना हे कळताच त्यांनी आपल्या जटेतून एक कृत्या (राक्षसी) निर्माण करुन राजावर सोडली. अंबरीषावर भगवंताची कृपा असल्याने राजाला काहीच त्रास न देता उलट भगंताचे सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. ते चक्र आवरुन धरणे देवादिकांनाही अशक्य झाले. अखेरीस राजा अंबरीषाची करुणा भाकल्याबर त्याच्या आज्ञेने ते शांत झाले. बार्शी येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात असलेल्या चक्रतीर्थात सुदर्शनचक्र शांत झाले. अशी अख्यायिका आहे. त्यानंतर आपल्या मुलास गादीवर बसवून राजाने वानप्रस्थाश्रम स्वीकारुन ईश्र्वरोपासनेत जीवन व्यतीत केले. त्या अंबरीषाला वर देणाऱ्या भगवंताचे बार्शीत पुराण प्रसिध्द मंदिर आहे. ज्या ठिकाणी चक्र शांत झाले त्याच ठिकाणी श्री भगवंताच्या आदेशानुसार दुर्वासांनी राजा अंबरीषास छळल्याबद्दल प्रायश्चित म्हणून तपश्चार्या केली. या तीर्थाचे आजचे स्वरुप हे या घटनेची ऐतिहासिक आठवण हा पंकक्षेत्रीचा पौराणिक ठेवा मानला जातो.
सकृतदर्शनी श्री उत्तरेश्वराच्या समोर जे कुण्ड दिसते त्या कुण्डाच्या मंदिराकडील तळभिंतीस केंद्रस्थानी एक भुयार असून त्या भुयारातून शेवाळलेल्या मार्गने आत गेल्यास आपणास एक नक्षीदार कमानीने युक्त असा भव्य दगडी सभा मंडप दिसून येतो. सभा मंडपाच्या कडेला सहा फुटा उंचीची आणशी एक कमान थोड्याश्या निरीक्षणाने दृष्टोत्पत्तीस येते जवळच दुर्वासांच्या तपशचर्येचे एक दगडी सिंहासन आपले लक्ष वेधून घेते. सिंहासनाजवळ आपणास त्रिशुळाचे आणि जीर्ण अशा कमंडलचे दर्शन घडते. सभामंडपाच्या केंद्रस्थानी गोलाकार तीर्थ असून तेच सुदर्शन चक्र गुप्त होण्याची जागा आहे. हे बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. तेथून अजूनही पाण्याचे झरे बाहेरील कुंण्डात झिरपताना स्पष्ट दिसून येतात. सभामंडपाच्या प्रवेश द्वाराशी तीन फुट उंचीच्या लहानशा दोन्ही बाजूस दोन ओवऱ्या दिसून येतात. व मध्यभागी आपणांस दुर्वासांच्या पादुकांचे दर्शन घडते.
असा हा पंकक्षेत्रीचा पौराणिक ठेवा सन १९७२ च्या अवर्षणाच्या काळात बार्शी नगरपालिकेच्या सौजन्याने अनेक भाविकांनी जवळून न्याहाळला आहे. अस हे चक्र गुप्त तीर्थाचे पूर्ण दर्शन यापुढे अभावानेच घडण्याची शक्यनता आहे. कारण त्यानंतर तीर्थाच्या पाण्याखाली हा ठेवा केव्हाच गुप्त झालेला आहे, झाकला गेलेला आहे.