सध्याचे श्री भगवंत मंदिर इ.स.च्या १३ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या हेमाडपंथी रचनेवरुन या मताला पुष्टी मिळते. इ.स. १२४५ मध्ये मूळ मंदिर बांधले जाऊन पुढील लाकडी मंडप १०० ते १५० वर्षांनी तयार झाला असे देगणीदारांच्या उल्लेखावरुन समजते. अंबरीष विजय नामक ग्रंथातील ओव्यांमध्ये बार्शीतील बारा पवित्र तीर्थांची नावे येतात. त्यामुळे १२ पवित्र तीर्थांचे गांव ‘बाराशिव’ यावरुन बार्शी असे नाव मिळाले असावे. इ.स. १७५९-६० नानासाहेब पेशव्यांनी मंदिराच्या खर्चासाठी सनद दिलेली आढळते.
सध्या उपलब्ध सनद १८९४ मधील इंग्रज सरकारची असून आहिल्यादेवी होळकर यांनीही मंदिरासाठी देणगी सनद दिल्याचे आढळते.
बार्शी शहरात श्री भगवंताचे मुख्य मंदिर हेमाडपंथी धारणेचे असून ध्वंजाकित शिखरावर दशावताराची शिल्पे कोरलेली आढळून येतात.
मुख्या गाभाऱ्यातील भिंतीवर महादेवाची पिंड, गणपती, अश्वमेधचा घोडा, सर्पकृतीतील सुदर्शन चक्र, शेषावरील विष्णु, चंद्र, सुर्य या शिल्पाकृती विशेष करुन कोरलेल्या आढळून येतात.
बाहेरील दगडी खांबावर पुराणातील प्रसंग, शिल्परुपे कोरलेले आढळून येतात. अखिल भारतात भूवैकुंठ म्हणून ओळखिला जाणाऱ्या पाठीशी लक्ष्मी घेऊन अंशरुपाने वावरणाऱ्या भक्ताच्या हाकेस धावून येणाऱ्या श्री भगवंताची सगुण सावली. शाळीग्रामाची शंख चक्र-गदा- पद्मासह विराजमान झालली मस्तकावर शिवलिंग धारण केलेली, विशाल छातीवर भृगऋषीचें अंगठ्यामधून पेलणारी, उजव्या पायाच्या अंगठ्यामधून सतत भागिरथी स्त्रवणारी मूर्ति भक्तगणांस शांत करते, तृप्त करते आणि फारच मोठे समाधान देऊन जाते.
कविराय राम जोशी (सोलापूरकर) यांनी भगवंताचा महिमा सांगणारे कवन (लावणीच्या रुपात रचलेले आहे. ) श्री अंबरीष विजय हा ग्रंथ प्रसिध्द आहे. याशिवाय कित्येक स्थानिक कर्विनी व कवयत्रींनी श्री भगवंताचे महात्म्य सांगणारी कवने, स्तोत्रे रचलेली आढळून येतात. ”अंबरीष वरद श्री भगवान ‘ अशा आवाहनाने श्री भगवंतावरील श्रद्धा भक्ती प्रकट केली जाते. हे भूलोकीचे वैकुंठ आहे.
श्री भगवंताच्या मंदीराप्रमाणेच बार्शी शहरात श्री उत्तरेश्वर (चक्रतीर्थ जेथे सुदर्शन चक्र शांत झाले.) मंदिराचे तसेच श्री मल्लिकार्जुन मंदिराचे महात्म्य आहे. याच मंदिरात संतश्रेष्ठ नामदेवाला सद्गुरु विसोबा खेचर यांचा उपदेश झाला होता.
“’द्वादशीचे गावी झाला उपदेश” असा नामदेवांच्या अभंगात उल्लेख आहे. विसोबांची समाधीही बार्शीला आहे असे के. आजगांवकर यांच्यासारख्या संशोधकांचे मत आहे. अन्य संशोधकांच्या मते ही भेट ओंढ्या नागनाथांच्या मंदिरात झाली. तथापी परंपरागत आख्यायिकेनुसार वरीलप्रमाणे हकीकत सांगितली जाते.
श्री भगवंताचा दुसरा परमभक्त जोगा परमानंद यांची समाधी मंदिरात उत्तरेकडील ओवरीत आहे. त्याची पुण्यतिथी प्रतिवर्षी साजरी होते. महिपतीबुवाच्या ‘भक्तिविजय’ ग्रंथात जोगा परमानंदाची कथा येते. दररोज रस्त्यावरुन दंडवत घालीत भगवंताच्या दर्शनास जाण्याचा त्याचा नित्यनियम असे. एकदा कोणीतरी त्यास भरजरी पीतांबर नेसायला दिला. त्याचदिवशी पाऊस पडल्याने रस्त्यावर चिखल झाला होता. चिखलाने पितांबर खराब होईल या विचाराने दंडवत घालण्याच्या सेवेत खंड पडला पण जोगा परमानंदाने लगेच भानावर येऊन स्वत:ला बांधून बैल हाकावयास लावून, फरफटत जाऊन, शरीर रक्तबंबाळ करुन घेतले.व त्या अवस्थेत भगवंताचे दर्शनास गेला, अशी कथा आहे. श्रीमद् भागवत ग्रंथ व श्री गुरुचरित्र पोथ्यामध्येही श्री अंबरिष महात्म्याचे वर्णण आढळून आले आहे. श्री समर्थ रामदास यांचा दासबोध व श्री संत तकाराम महाराज यांच्या गाथामध्येही मंदीरास भेट दिल्याचे पुरावे मिळतात.