ट्रस्ट विषयी

श्री भगवंत मंदिराचे सुशोभिकरण झालेले आहे. इ.स. १९३० ते १९४० या काळात कै. श्री. भगवंत आबाजी शेटे, १९४०-१९८९ या काळात नानासाहेब बूडुख, १९८९-२००९ कै. डॉ. द.गं. तथा आण्णासाहेब कश्यपी हे सरपंच होते. डॉ. आण्णासाहेब कश्यपींनी, तन, मन, धनाने भगवंताची व भगवंत मंदिराची सेवा केली. जुन्या काळापासून चालत आलेले सर्व उत्सत चाल ठेवून त्यांनी मंदिराचे पावित्र्य अभंग राखले. प्रतिवर्षी वैशाख महिन्यात शुद्ध दशमी ते द्वादशी अखेर अंबरीष वरद श्री विष्णुच्या सुदर्शनचक्र प्रगटनाचा व दुर्वासाचे गर्वहरणाचा जो प्रसंग घडला त्याची स्मृती म्हणून उत्सव साजरा केला जात असतो. श्रीस अभिषेक, महापूजा, प्रवचने, किर्तने विविध भजनी मंडळांची भजने व पालखीची मिरवणुक हे उपक्रम चालू असतात. या उत्सवाला अधिक व्यापक स्वरुप आजही प्राप्त झाले आहे. वैशाख मासातला १0 दिवसांचा भगवत उत्सव ही बार्शीकरांना आनंदाची पर्वणीच असते. आजच्या सरपंच व इतर ट्रस्टीने मंदिराचे प्राचीन स्वरुप बऱ्याच अंशी बदलले असून मंदीराचे सौंदर्य वृद्धिंगत केले आहे. त्यामुळे आषाढी व कार्तिकी एकादशी या काळात येणाऱ्या भक्तांची व वारकऱ्यांची निवास व अन्नपाणी व्यवस्था उत्तम प्रकारे आजच्या विश्वस्त मंडळींनी केली आहे.

२००९ पासून सरपंच पदावर श्री दादासाहेब बूडुख आहेत. याशिवाय डॉ. बी. वाय. यादव, श्री. विजयकिशोर सोमाणी, श्री. हंसराजजी झंवर, श्री. मुकुंदराव कुलकर्णी (निरमावाले) श्री नानासाहेब सुरवसे व श्री एन. एम. सुपेकर हे सर्वं ट्रस्टी अत्यंत आस्थेने मंदीराचे काम पहात आहेत.

श्री भगवंत मंदिराच्या जुन्या भिंती कायम ठेवून त्याला सुशोभिरणाच्या दृष्टीने पुरातन पद्धतीच्या खिडक्या व भिंतीला तटबंदीसारखे डूम बसवले आहेत. पूर्व पचिम, दक्षिण बाजूंचे तीन लाकडी दरवाजे सागवानी लाकडाचे नवीन करण्यात आले आहेत व तीनही दरवाज्याला जय विजयच्या सुंदर मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. उत्तरेचा जुने बेठ्या स्वरुपाचे एकमजली स्वयंपाक घर होते. पत्र्याचे छप्पर असल्याने पावसाळ्यात पंढरपूरला जाणारे भाविक हाजारोंच्या संख्येने आषाढी एकादशीवेळी मुक्कामाला असतात त्यांच्यासह सर्वांचीच फार गैरसोय होत होती. त्यामुळे जुन्या स्वयंपाक घराच्या जागेवर तीन मजली प्रत्येकी ३५00 चौरस फूट इमारत नवीन तयार झाली आहे. २000 चौ. फुटाचे ३ हॉल ५, ६ खोल्या भरपूर स्वच्छता गृहासह तयार करण्यात आल्या आहेत. या इमारतीचे लगत मागील बाजूस, दत्तमंदिराचे बाजूस श्री जोगापरमानंदाच्या समाधीचे वर अद्यायावत अतिथी गृह, तीन रुम, १ हॉल जेणे करुन येणारे प्रवचनकार किर्तनकार यांची सोय होत आहे. ही इमारत कै. श्रीमती कमलताई बजरंग देशमुख यांचे उदार देणगीतून बांधकाम करण्यात आले आहे. श्री मंदिराच्या दक्षिण बाजूच्या खुल्या पटांगणात श्री भगवंत भक्त श्री शेखर चिल्लाळ यांनी ४000 चौ. फुटाचा हवेशीर परंतू अच्छादित प्लास्टिकच्या शीटचा मंडप करुन दिला आहे. तसेच मंदिराच्या पूर्व बाजूला मंदिराची जागा कै. डॉ. दातीर यांनी स्थापन केलेल्या गुरुवार क्लबच्या जागेमध्ये सुमारे ३000 चौ. फुटाचे ३ मजली बांधकाम पूर्ण होत आहे. तळमजल्यातून मंदिरातला प्रवेश हा भक्ताला पाय धुवून दर्शनाला येण्याची सोय आहे. उत्तर बाजूला श्री गुरुवार क्लबच्या मागे हॉल उपलब्ध होत आहे.

पुण्याचे एन.सी.एल्‌. चे माजी प्रमुख डॉ. आर.एन्‌. शुक्ला सर यांनी श्री भगवंत मंदीरास २0१२ साली भेट दिली. ते इतिहास, पूरातत्व व अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत. तेंव्हा त्यांनी स्पष्ट सांगीतले की श्री तिरुपती बालाजी मध्ये जी उर्जा आहे तेवढीच उर्जा श्री भगवंताचे मुर्ती मध्ये आहे. असा आपल्या सामान्य माणसाचा पांडुरंग व तिरुपती बालाजी आहे की ज्याचे सहज, सुलभ केव्हाही दर्शन घेता येते.

असा आहे या द्वादशीक्षेत्राचा महिमा !

हे द्वादश क्षेत्रीचे म्हणजेच बार्शीचे भगवंत मंदीर म्हणजे भक्त अंबरीषाच्या भक्तीचे शाश्वत स्मारक आहे. जशी श्री भगवंताने अंबरीषावर कृपा केली तशी सर्व भक्तांवर कृपा करो हीच सदिच्छा “’अंबरीष वरद श्री भगवान.”